Home Cities जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच भाजपने आपल्या संघटन बळकटीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीत जळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी व्यापक रणनिती आखण्यात आली.

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची बैठक जी. एम. फाउंडेशन कार्यालयात पार पडली. बैठकीस प्रदेश संघटन मंत्री विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी तसेच पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती लाभली. भारतमाता, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली तसेच गोवा दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी बोलताना विजय चौधरी म्हणाले की, “जळगाव जिल्हा आणि शहर हा भाजपचा मजबूत बालेकिल्ला असून कार्यकर्ते वर्षभर लोकांमध्ये राहून पक्षाची विचारधारा पोहोचवतात. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे सर्व 358 प्रभागांतील बूथरचना काम आजपासून युद्धपातळीवर सुरू करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती घराघरात पोचवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तत्काळ जनसंपर्क सुरू करण्याचे निर्देश दिले. विजय चौधरी यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देत “शेवट विजय आपलाच होणार आहे, मात्र निष्काळजीपणा नको” असे आवाहन केले.

बैठकीत विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे यांनी संघटनात्मक कामाचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक पदाधिकारी व आघाडी अध्यक्षांकडून त्यांच्या विभागातील तयारी, रचना आणि जनसंपर्काबाबत माहिती घेऊन आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज राहण्याचा संदेश त्यांनी दिला.

या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, भारतीताई सोनवणे, माजी पश्चिम जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील व माजी महापौर सीमाताई भोळे यांच्यासह जिल्हा व महानगरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. संपूर्ण संघटना एकदिलाने निवडणूक रणांगणात उतरायला सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.


Protected Content

Play sound