मुंबई (वृत्तसंस्था) संख्याबळाच्या अभावामुळे सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता व्यक्त करणाऱ्या भाजपने मध्यावधी निवडणुकांची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. भाजपने संघटनात्मक बांधणीसह विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
भाजपने संघटनात्मक पुनर्बांधणीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्ते, नेते यांना संघटनात्मक बांधणी नव्याने मजबूत करण्याचे आणि वाढवण्याचे आदेश भाजपकडून देण्यात आले आहेत. मध्यावधी निवडणुका लागल्यास पक्षाने संघटनात्मक तयार रहावं, यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी दादरमधील वसंत स्मृती कार्यलयात उद्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मतदारसंघाचा आढावा घेत संघटनात्मक बांधणीसंदर्भात चर्चा होणार आहे. तर 15 तारखेला सकाळी साडेदहा वाजता आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर 16 तारखेला निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेण्यात येणार आहे.