मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. सत्तास्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये गेल्या जवळपास आठ दिवसांपासून हालचाली सुरु आहेत. मात्र, विधानसभेचा निकाल लागून आठवडा झाला तरीही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. मग महायुतील बहुमत मिळून देखील आतापर्यंत सरकार का स्थापन झालं नाही? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यातच महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. पण एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोलले जात आहे. मात्र, गृहमंत्री पद सोडण्यास भाजपा तयार नसल्याची चर्चा आहे.
महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट जास्त आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट जास्त आहे. स्ट्राइकरेटनुसार आम्ही २ नंबरवर आहोत. महायुतीमध्ये भाजप एक नंबरवर आणि आम्ही दोन नंबरवर आहोत. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी नेहमी देण्यात येते. यावेळी जरा अडचण जास्त आहेत. दरवेळी १६० असतात. यावेळी जास्त आमदार आहेत. सर्व पक्षांमध्ये नवीन जुने चेहरे येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होऊन गेला पण अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे यामागे नेमकं कारण काय आहे? की महायुतीत अस्वस्थता आहे का? असं पत्रकार परिषदेत विचारले असता भुजबळ म्हणाले, “सरकार स्थापन होण्यासाठी वेळ लागत असला तरी अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री असले तरी काही अडचण निर्माण झालेली नाही. राज्य व्यव्यवस्थित सुरु आहे. सर्व अधिकारी देखील त्यांचे त्यांचे काम पाहत आहेत”, असे छगन भुजबळ यांनी सांगितंले.