भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या आंदोलक महिला कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

bjp mla

अहमदाबाद (वृत्तसंस्था) नरोदातील कुबेरनगरमध्ये रहिवाशांच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या एका महिलेला भाजप आमदाराने जमिनीवर पडेस्तोवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडलीय. भाजप आमदार बलराम थवानींचा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असे पिडीत महिलेचे नाव असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुख आहेत.

 

नीतू तेजवानी या काही दिवसांपूर्वी थवानींच्या कुबेरनगरमधील कार्यालयात गेल्या होत्या. विभागातील घरे आणि कार्यालयांतील कापलेल्या नळजोडण्या दोन दिवसांत पुन्हा दिल्या नाहीत तर, कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा त्यांनी थवानींना दिला होता. त्यानंतर थवानींचा भाऊ स्थानिक नगरसेवक किशोर हे गेल्या आठवड्यात त्यांनी पाहणी करतांनाही तिथे वाद झाला होता. तर किशोर यांनी व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोपही झाला होता.

 

दरम्यान, कुणालाही मारहाण करण्याचा माझा हेतू नव्हता. जमावाकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. स्वसंरक्षणासाठी मारलेली लाथ चुकून महिलेला लागली, असे स्पष्टीकरण आमदार बलराम थवानी यांनी दिले आहे. परंतु नारिंगी रंगाचा कुर्ता घातलेले बलराम महिलेला लाथा मारत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. तसेच त्यांच्या बाजूला सफेद कुर्त्यात असलेली व्यक्ती त्या महिलेच्या कानशिलात लगावताना दिसत आहे.

 

नीतू तेजवानी या ‘थवानींना भेटण्यासाठी रविवारी त्यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर कार्यालयासमोरच धरणे धरण्याचा निर्णय घेतला. नळजोडण्या देण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत दिली. पण थवानी आणि त्यांच्या समर्थकांनी आम्हाला तेथून जबरदस्तीने हटवण्यास सुरुवात केली. विरोध केला असता आम्हाला त्यांनी मारहाण केली, असे नीतू तेजवानी यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content