चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यामान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापल्यापासून भाजपात मोठा अंतर्गत कलह सुरु आहे. आ.स्मिता वाघ यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून देखील पक्षात दोन गट पडले आहेत. एकंदरीत दगाफटका टाळण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी धक्कातंत्र देण्याचे ठरविले असून चाळीसगावचे आ.उन्मेष पाटील ऐनवेळी भरणार उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येतेय. विशेष म्हणजे आ.पाटील यांना तयारीत राहण्यास सांगितले असल्याचे वृत्तदेखील आहे.
भाजपचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापून जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिताताई वाघ यांना देण्यात आलेय. परंतु यामुळे ए.टी.पाटील हे प्रचंड नाराज असून बंडाच्या पावित्र्यात आहेत. ए.टी.पाटील यांच्यामुळे पक्षाला मोठा फटका बसण्याचा धोका लक्षात घेता स्मिता वाघ यांचे तिकीट बदलवून आमदार उन्मेष पाटील यांना देण्यासाठी दिल्ली येथे मोठ्या हालचाली झाल्याचे कळते. अगदी उन्मेष पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची देखील चर्चा रंगली आहे. आज सायंकाळपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. चाळीसगावात आमदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. परंतू यासंदर्भात आ.उन्मेष पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र कार्यकर्त्यांच्या हालचाली लक्षात घेता त्यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.