दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावरील टीका तीव्र करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसनेही जोरदार पलटवार करायला सुरुवात केलीय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी गुरुवारी भाजपवर गंभीर आरोप केला. राजीव गांधी यांची हत्या ही भाजपमुळेच झाली, असे ट्विट पटेल यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींवर भ्रष्टाचारी नंबर १ असल्याचा आरोप केला होता. आता या आरोपाला काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘त्यांचे दरबारी त्यांना क्लीन नंबर १ म्हणायचे पण, खरं तर राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर १ होते’, असा आरोप मोदींनी मंगळवारी एका प्रचारसभेत केला होता. पंतप्रधान असताना राजीव गांधींनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर सहकुटुंब सुट्टीवर जाण्यासाठी केला होता,असे मोदी म्हणाले होते. विराटचा अशा पद्धतीने वापर करणे ही राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड नव्हे का? असा सवालही मोदींनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देत राजीव गांधींच्या सुरक्षेचा मुद्दा पटेल यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे पटेल यांनी भाजपच्या तिरस्कारामुळेच राजीव यांची हत्या झाली, असे सुचवण्याचाही प्रयत्न केला आहे. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी केंद्रात तिसऱ्या आघाडीचे सरकार होते. या सरकारला भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता भाजप या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.