Home Cities यावल यावल येथे भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती; नगराध्यक्ष पदासाठी आठ महिलांचा दावा

यावल येथे भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती; नगराध्यक्ष पदासाठी आठ महिलांचा दावा


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी प्रक्रियेला वेग दिला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज भाजपाच्या निवड समितीमार्फत घेण्यात आल्या. या मुलाखतींना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती लाभली असून, नगराध्यक्ष पदासाठी आठ महिला उमेदवारांनी आपली पात्रता मांडली आहे.

या निवड समितीत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, डॉ. राजेंद्र फडके, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष (पूर्व विभाग) चंद्रकांत बाविस्कर, रावेरचे आमदार अमोल जावळे आणि रावेर लोकसभा मतदारसंघ प्रमुख नंदकिशोर महाजन यांचा समावेश होता. समितीसमोर नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी फेगडे, नंदा महाजन, निलीमा महाजन, पूजा रावते, अश्विनी येवले, सानवी सराफ, दिपाली बारी आणि संध्या बारी या आठ महिलांनी मुलाखती दिल्या. पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार, समिती दोन दिवसांत मुंबईत झालेल्या चर्चेनंतर अंतिम उमेदवाराचे नाव निश्चित करणार आहे.

नगरसेवक पदांसाठी देखील प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. एकूण ११ प्रभागांतील २३ नगरसेवक पदांसाठी तब्बल ६२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. पक्षांतर्गत चर्चा, स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि जनाधार यांचा विचार करूनच अंतिम उमेदवारी निश्चित केली जाईल, असे पक्ष नेत्यांनी सांगितले.

याच बैठकीदरम्यान शहरातील जवळपास ५० ते ५५ तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावल शहरातील फैजपूर मार्गावरील शासकीय पगारदार नोकरांच्या पतपेढीच्या आवारात झालेल्या सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश सदस्य हिरालाल चौधरी, निवडणूक प्रभारी हर्षल पाटील, आर. जी. पाटील, प्रभाकर सोनवणे, उज्जैनसिंग राजपूत, नारायण चौधरी, सागर कोळी, तसेच तालुका सरचिटणीस भरत पाटील आणि ज्ञानेश्वर तायडे उपस्थित होते.

या मुलाखतींमुळे यावल नगरपालिकेतील राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्ष पदासाठी भाजपात चुरस निर्माण झाली आहे. पक्षाने महिलांना दिलेले प्राधान्य आणि नव्या कार्यकर्त्यांचा वाढता ओघ पाहता, या निवडणुकीत भाजप जोरदार तयारीसह उतरल्याचे स्पष्ट होते.


Protected Content

Play sound