Home राजकीय नागपुरात भाजपकडून 151 जागांसाठी 300 इच्छुकांना तयारीचे निर्देश

नागपुरात भाजपकडून 151 जागांसाठी 300 इच्छुकांना तयारीचे निर्देश


नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज व उद्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेक पक्षांनी अधिकृत यादी जाहीर करण्याऐवजी थेट उमेदवारांना अर्ज व कागदपत्रांची तयारी करण्याचे निर्देश देण्याची रणनीती अवलंबल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राऊंड असलेल्या नागपूर महापालिकेतच भाजपसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. नागपूर महापालिकेच्या 151 जागांसाठी भाजपकडून तब्बल 300 इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावा केल्यामुळे पक्षांतर्गत कोंडी निर्माण झाली आहे. अनेक प्रभागांमध्ये एकापेक्षा जास्त सक्षम दावेदार असल्याने अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रभागांमध्येही गोंधळसदृश्य परिस्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नागपूर भाजपने सध्या तरी सुमारे 300 कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी उद्याच भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नागपूर महापालिकेतील 151 जागांपैकी युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी सुमारे 8 ते 10 जागा सोडण्यात येणार असून उर्वरित सुमारे 140 जागांवर भाजप निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला मर्यादित जागांवरच समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र आहे.

अजूनही अनेक प्रभागांमध्ये अंतिम उमेदवार ठरवता न आल्याने पक्षश्रेष्ठींकडून विचारमंथन सुरू आहे. 300 इच्छुकांपैकी नेमके कोणाला उमेदवारी मिळणार, हे उद्या स्पष्ट होणार असल्याचे संकेत दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये विरोधकांचीही रणनीती जवळपास निश्चित होत असल्याचे दिसते. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र लढण्यावर जवळपास एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संभाव्य जागावाटपानुसार काँग्रेस 129, राष्ट्रवादी काँग्रेस 12 आणि शिवसेना 10 जागांवर निवडणूक लढवण्याच्या सूत्रावर स्थानिक नेत्यांनी होकार दिल्याचे समजते.

दुसरीकडे, भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला युतीसाठी विचारणा न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू केली आहे. या दोन्ही पक्षांमधील बोलणी सकारात्मक टप्प्यावर असल्याची माहिती असून नागपूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजपची अंतर्गत कोंडी, तर विरोधकांची एकजूट, यामुळे आगामी लढत अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


Protected Content

Play sound