रावेर (प्रतिनिधी) भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या सरकारने केवळ दुष्काळाची घोषणा केली आहे, पण त्याप्रमाणे अंमलबजावणी कुठेच दिसत नाही. त्यांनी दुष्काळाचेही तीन प्रकार केले आहेत, ते कशाबद्दलच गंभीर नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज येथे केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
ते यावेळी पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करू आणि कर्ज भरू न शकणाऱ्यांवर खटले दाखल होऊ देणार नाही, असे जाहीर केले आहे. आज बर्याच दिवसांनंतर रावेर भागात पंजा दिसतोय, त्यालाच मतदान करा , असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी उमेदवार डॉ. उल्हास पाटील व अॅड. रवींद्र पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.