जळगाव-शेखर पाटील (संपादक – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज ) | निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांबाबत जळगाव महापालिका आणि वरणगाव नगरपालिका या दोन्ही ठिकाणी दोन स्वतंत्र निर्णय घेण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याला पक्षातील सुप्त अंतर्गत कलह तर कारणीभूत नव्हे ना ? असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
अलीकडेच नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यानंतर जळगाव महापालिकेची निवडणूक देखील झाली. प्रदीर्घ काळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यामुळे प्रत्येक पक्षात एकाच जागेसाठी अनेक उमेदवार दावेदार होते. यातून जवळपास प्रत्येक पक्षात बंडखोरीला उधाण आले. यात जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला साहजीकच मोठा फटका बसला. निवडणुकीच्या काळात ठिकठिकाणी बंडखोरी उफाळून आली. नगरपालिकांचा विचार केला असता लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी सर्वात मोठी घडामोड ही वरणगावात घडली.

वरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील काळे यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार नसल्याची चाहूल लागताच त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला. त्यांनी तिकिट जाहीर होण्याआधीच थेट मंत्री संजय सावकारे यांच्यासह रक्षाताई खडसे यांच्यावर तोफ डागली. यानंतर, त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. निवडणुकीच्या प्रचारात देखील प्रचंड प्रमाणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. निकालात भाजपचे सर्वाधीक १४ नगरसेवक निवडून आले असले तरी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुनील काळे यांनी बाजी मारली.
निकाल लागताच सुनील काळे यांनी मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांची प्रतिमा हातात घेऊन आनंदोत्सव साजरा केला. यानंतर त्यांनी जामनेर येथे जाऊन त्यांची भेट देखील घेतली. याप्रसंगी त्यांनी आपण भाजप पक्ष सोडलेला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. यानंतर सुमारे दीड महिन्यांनी जळगाव महापालिकेची निवडणूक झाली असतांना देखील भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांच्या भावनांचा उद्रेक झाल्याचे दिसून आले.
जळगावात पक्षाने तिकिट नाकारल्यामुळे अनेकांनी बंडाचा पवित्रा धारण केला. यात भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांच्यासह इतरांचा समावेश होता. याबाबत पक्षाने कडक भूमिका घेत निवडणुकीच्या काळातच २७ पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबीत केले. या माध्यमातून पक्षशिस्तीच्या बाबत वरिष्ठांनी योग्य तो संदेश दिल्याने मतदारांमधील संभ्रम दूर झाला. आणि अर्थात, महापालिकेच्या निकालातून याचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसून आले.
एकीकडे जळगाव महपालिकेच्या निवडणुकीत भाजप पक्ष नेतृत्वाने बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी केली असतांना वरणगावात मात्र निकाल लागून दोन महिने उलटून गेल्यानंतर देखील काहीही कार्यवाही न होणे म्हणजे पक्षाच्या दोन भिन्न भूमिका दाखविणाऱ्या बाबी मानाव्या लागणार आहेत. जळगावमध्ये हकालपट्टी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मध्यंतरी, त्यांचे निलंबन मागे घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली असली तरी अद्यापही याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
याच्या अगदी उलट वरणगावमध्ये सुनील काळे यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू केल्यानंतर अनेकदा आपण पक्ष सोडला नसल्याचे सांगितले. गेल्या आठवड्यात तर त्यांनी थेट ‘भाजपच्या निष्ठावंतांचा मेळावा’ या नावाने बैठक घेतली. यात पक्षातील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यात सुनील काळे यांच्यासह राजेंद्र चौधरी आणि प्रा. जतीन मेढे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. यात या तिन्ही मान्यवरांनी ना. संजय सावकारे यांच्यावर टिकास्त्र सोडत आपणच भाजपचे खरे निष्ठावंत असल्याचे ठासून प्रतिपादन केले. यानंतर सुनील काळे यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भुसावळ तालुक्यात पुन्हा एकदा वरणगावचा ‘ट्रॅक्टर पॅटर्न’ राबविण्याचे सूतोवाच केल्याची बाब ही अजून लक्षणीय अशीच आहे.
एकीकडे जळगावात आ. राजूमामा भोळे यांच्या विरोधात विधानसभेत दंड थोपटणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्यांना भाजपने बाहेरचा रस्ता दाखविला असून महापालिका निवडणुकीत बंडाचे निशाण फडकावणाऱ्यांचे देखील निलंबन केले आहे. तर दुसरीकडे वरणगावात मात्र स्थानिक आमदार व मंत्री संजय सावकारे तसेच स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्यावर तोफ डागणाऱ्याच्या विरोधात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
एवढेच नव्हे तर वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे निवडून आल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि भाजपचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी त्यांचा सत्कार केला. पक्षाची हीच दुहेरी भूमिका ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारी ठरली आहे.
जळगावातील निलंबीत पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी रद्द होणार का ? सुनील काळे यांचे निलंबन होणार की, पक्ष त्यांना ‘आपला’ म्हणणार ? आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीत काळे यांचा ‘ट्रॅक्टर फॅक्टर’ भाजपला कितपत डोकेदुखी ठरणार ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वरणगावातील या घोळाच्या माध्यमातून मंत्री संजय सावकारे यांना अडचणीत आणण्याचा कुणी प्रयत्न तर करत नाही ना ? याला पक्षातील सुप्त संघर्षाचा आयाम तर नव्हे ना ? या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार याचीच सर्वांना प्रतिक्षा आहे.



