नवनीत राणांचा पराभव झाल्याने भाजप शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी दिला राजीनामा

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावती महाराष्‍ट्रात पराभवाची जबाबदारी स्‍वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा देण्‍याची तयारी दर्शविलेली असताना दुसरीकडे, अमरावतीत भाजपचे शहराध्‍यक्ष आमदार प्रवीण पोटे यांनी देखील अमरावती लोकसभा मतदार संघातील भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्‍वीकारून पदाचा राजीनामा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडे पाठवला आहे.

लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघात झालेल्‍या पराभवाची नैतिक जबाबदारी म्‍हणून अमरावती शहर अध्‍यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तरी राजीनाम्‍याचा स्‍वीकार करावा, ही विनंती, असे दोन ओळींचे राजीनामा पत्र प्रवीण पोटे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ई-मेल द्वारे बुधवारी सायंकाळी पाठवले. या पत्रावर अजून कोणताही निर्णय घेण्‍यात आलेला नाही. अमरावती मतदार संघात नवनीत राणा यांचा कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी पराभव केला आहे. अमरावतीतून नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्‍याच्‍या दोन दिवस आधी अमरावतीतील भाजपच्‍या नेत्‍यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘काहीही करा, पण नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका’ असे साकडे घातले होते. नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला विरोध करणाऱ्या नेत्‍यांमध्‍ये प्रवीण पोटे यांचाही समावेश होता. प्रवीण पोटे हे विधान परिषद सदस्‍य आहेत.

Protected Content