
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत बिनविरोध निवडींची मालिका सुरूच असून, प्रभाग क्रमांक 5-ब मधून भाजपचे उमेदवार परीक्षित बऱ्हाटे यांच्या बिनविरोध निवडीने भाजपच्या शक्तीमध्ये आणखी वाढ झाली आहे. अपील दाखल असलेल्या प्रभागांमध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत होती. याच पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या माघारीनंतर हा प्रभागही भाजपच्या झोळीत सहज जमा झाला.

आज माघार प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवाराने स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे भाजपचे परीक्षित बऱ्हाटे हे या प्रभागातून कोणत्याही चुरशीशिवाय थेट विजयी ठरले. अपील दाखल असलेल्या या जागेवर आजचा निर्णय हा भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे, कारण या प्रभागावर निवडणुकीची अनिश्चितता निर्माण झाली होती.
यापूर्वी 2 डिसेंबरपूर्वीच भुसावळ नगर परिषद निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्या पार्श्वभूमीवर अपील दाखल असलेल्या तीन जागांपैकी आणखी एका जागेवर बिनविरोध यश मिळाल्याने पक्षाचा आकडा वाढून निवडणूक समीकरणांमध्ये एकतर्फी झुकाव दिसू लागला आहे. स्थानिक राजकीय वातावरणात या बिनविरोध निवडीचा मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनला आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्ष नेत्यांनी याला जनतेचा विश्वास म्हणून संबोधले आहे. दुसरीकडे, विरोधकांच्या उमेदवाराच्या माघारीमागील कारणांबाबत मात्र स्थानिक पातळीवर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. निवडणूक लढतीचा थरार कमी होत असला तरी या बिनविरोध निवडींमुळे आगामी राजकीय घडामोडींना वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



