जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष (भाजप) नेहमी हिटलरशाही पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून, सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जातात. भाजप हे ‘ड्रायक्लिनर मशीन’ आहे, ज्यामध्ये भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश देऊन त्यांना साफ करून घेतले जाते, असा गंभीर आरोप स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करूणा मुंडे यांनी केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिंठा विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
फोडाफोडीच्या राजकारणावर टीका :
करूणा मुंडे यांनी भाजपच्या ‘फोडाफोडी’च्या राजकारणावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, “भाजपने सत्ता मिळवण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षाप्रवेशाचे आमिष दाखवले. यामुळे मोठे नेते थेट भाजपमध्ये सामील होत आहेत.” भाजप म्हणजे ड्रायक्लिनर मशीन असून, तिथे प्रवेश केलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांवर कोणतीही चौकशीची कारवाई केली जात नाही. यापूर्वी भाजपने शिवसेना फोडून दोन गट केले आणि शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतले. यामुळे आता शिंदे गटाचे मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण होत असून, भाजपचे उद्दिष्ट इतर पक्षांना संपवण्याचे आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.

सर्वसामान्य माणूस भरडला जातोय :
सत्ताधाऱ्यांच्या या राजकारणामुळे राज्यातील सर्वसामान्य माणूस भरडला जात असल्याचा मुद्दा मुंडे यांनी उपस्थित केला. शेतकरी, महिला, तरुण, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या गंभीर प्रश्नांवर त्यांनी लक्ष वेधले. “शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही, स्त्रियांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, तरुणांना रोजगार नाही आणि महागाईने सामान्य जनतेचे जगणे मुस्किल केले आहे,” असे त्या म्हणाल्या.
मनोज जरांगे पाटीलांना अध्यक्षपदाची ऑफर :
राज्यातील हे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वराज्य शक्ती सेना या पक्षाची स्थापना केली असून, या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम करणार असल्याचे करूणा मुंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही मोठी भूमिका मांडली. मराठा आरक्षणासाठी १८ पगड जातीच्या लोकांसाठी लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मी माझ्या पक्षाचे (स्वराज्य शक्ती सेना) अध्यक्षपद देण्यासाठी तयार असल्याचे मोठे विधान त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.



