मुंबई (वृत्तसंस्था) सत्तेचे समीकरण जुळवून आणण्यासाठी भाजपकडून आमच्या काही आमदारांना फोन येत आहेत. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. कारण उद्यापर्यंत सत्तास्थापनेचा घोळ मिटला नाही तर राज्यात मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी रात्री १२ वाजता विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असून त्यानंतर राज्य राष्ट्रपती राजवटीकडे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता फोडाफोडीचे राजकारणंही सुरू झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदारांना भाजपकडून फोन केले जात असून त्याचा गौप्यस्फोट खुद्द जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी केला. दरम्यान, असे कितीही प्रयत्न झाले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केला.