नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आणि जुन्या जनसंघाचे माजी कार्यकर्ते सी.पी. राधाकृष्णन यांचे नाव भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत घोषित करण्यात आले. यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीत हालचालींना वेग आला असून, अद्याप त्यांच्या उमेदवारावर अंतिम निर्णय झालेला नाही.
उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी निश्चित करण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिला गेला होता. काल झालेल्या संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या नावाची घोषणा होताच एनडीएने या निवडणुकीत बिनविरोध विजय मिळवण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या अनुषंगानेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याशी संपर्क साधत बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

विरोधकांच्या INDIA आघाडीकडून अद्याप कोणतेही नाव समोर आलेले नसले तरी तामिळनाडूतून उमेदवार देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील सत्ताधारी पक्ष द्रमुकने तामिळनाडूतील एखाद्या अनुभवी नेत्याला उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, द्रमुककडून किंवा INDIA आघाडीकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. काही अहवालांनुसार, भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी चर्चाही करण्यात आली होती, जे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
सी.पी. राधाकृष्णन हे पश्चिम तामिळनाडूतील गौंडर समाजाचे आहेत आणि त्यांचे आरएसएस व जनसंघाशी जुने नाते आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारी देणे म्हणजे तामिळनाडूसारख्या राज्यात आपली पकड वाढवण्याचा प्रयत्न मानला जात आहे. या निर्णयामुळे दक्षिण भारतातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळू शकते.
उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट असून, 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. INDIA आघाडीकडून उमेदवारी दिली जाणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर त्यांनी उमेदवार दिला, तर तो पुढील दोन दिवसांत जाहीर केला जाऊ शकतो.



