Home Cities भुसावळ स्मार्ट मीटरच्या विरोधात वरणगावात भाजप आक्रमक; महावितरणवर हल्लाबोल

स्मार्ट मीटरच्या विरोधात वरणगावात भाजप आक्रमक; महावितरणवर हल्लाबोल


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीकडून वरणगाव शहर आणि परिसरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला भाजपने तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सामान्य नागरिकांच्या घरात स्मार्ट मीटर बसणार नाही, असे सांगितले असतानाही महावितरण मनमानी पद्धतीने हे मीटर जबरदस्तीने बसवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. याच मुद्द्यावरून आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत, ‘हल्लाबोल’ आंदोलन केले.

२१ हजारांचे बिल: गरीब जनतेची कोंडी
स्मार्ट मीटरमुळे सामान्य ग्राहकांना वीजबिलाचा मोठा फटका बसत असल्याचा दावा भाजपने केला आहे. सिद्धेश्वर नगरसारख्या गरीब वस्तीतील लोकांनाही २१ हजार रुपयांपर्यंतची भरमसाठ बिले आल्याचे निदर्शनास आणून दिले. बोर्डी येथील अरुण गोपाळ यांच्या बाबतीतही असेच २१ हजार रुपयांचे बिल आल्याचे उदाहरण देत, हे मीटर तात्काळ काढण्याची मागणी करण्यात आली. बोर्डीसह इतर गावांमध्येही नवीन स्मार्ट मीटर न लावण्याची आणि लावलेले मीटर काढण्याची मागणी भाजपने केली आहे.

इतर मागण्या: वाहतुकीस अडथळा दूर करा
स्मार्ट मीटरच्या विरोधासोबतच भाजपने शहरातील वाहतूक व्यवस्थेशी संबंधित काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या. वरणगाव शहरातील रहदारीस अडथळा ठरत असलेले डीपी (विद्युत वितरण केंद्र) स्थलांतरित करावेत, तसेच तिरंगा सर्कल ते प्रभात फेरी मार्गातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वीज खांबांना तात्काळ हटवावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

नगराध्यक्षांचा इशारा: मनमानी न थांबल्यास रस्त्यावर उतरणार
या आंदोलनाचे नेतृत्व नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष शेख आखलाक, भाजप तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, भाजप अध्यक्ष सुनील माळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता एम.एस. पंचभूते यांना इशारा दिला की, जर महावितरणचा हा मनमानी कारभार थांबला नाही, तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.


Protected Content

Play sound