Home Cities जळगाव राहुल गांधींच्या कृतीविरोधात भाजप आक्रमक ; पोस्टर जाळून निषेध

राहुल गांधींच्या कृतीविरोधात भाजप आक्रमक ; पोस्टर जाळून निषेध


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संसदेत केलेल्या कथित कृतीच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात आंदोलन करण्यात आले. खासदार राहुल गांधी यांनी संसदेत सिलेंडरवर चहा करण्याबाबत केलेल्या प्रकाराचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी इच्छा देवी चौफुली येथे आंदोलन करत त्यांचे पोस्टर जाळून निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूकही ठप्प झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी इच्छा देवी चौफुली येथे एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. संसदेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या कृतीचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचे पोस्टर जाळत निषेध व्यक्त केला तसेच पोस्टरला चपला मारून संताप व्यक्त केला.

आंदोलनामुळे काही काळासाठी चौफुली परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याने परिसरात गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

या आंदोलनात आमदार राजू मामा भोळे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक चौधरी, महिला मोर्चाच्या नीता परदेशी, विशाल त्रिपाठी, हर्षल सिकवाल यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे देशाच्या संसद आणि जनतेचा अपमान होत असल्याचा आरोप केला. यापुढे अशा कृतीचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

दरम्यान, इच्छा देवी चौफुली येथे झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.


Protected Content

Play sound