भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बियाणी पब्लीक स्कूलमधील जलतरण तलावातल्या क्लोरीन गळतीमुळे पाच जणांना बाधा झाली असून यातील एक अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बियाणी पब्लीक स्कूलमधील जलतरण तलावात क्लोरीनचे प्रमाण वाढल्यामुळे चार बालके आणि एक प्रौढाला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तीन बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा ते सातच्या बॅचमधील जलतरणपटूंना हा त्रास झाला. यातील मुले पाण्यात उतरली असता त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. यामुळे ते तातडीने बाहेर आले. यात आदित्य प्रशांत चौधरी, प्रतीक संदीप जोहरे, तन्मय विजय जोहरे, कार्तीक चेतन फालक या मुलांचा समावेश होता. तर प्रदीप सुधाकर जोहरे (वय ३५) यांनाही त्रास जाणवू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.