अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावाजवळ दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ जून रोजी घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. बापू जंगलू कुंभार रा. ममुराबाद ता.जळगाव ह.मु. जळोदरोड अमळनेर असे मयत दुचाकीस्वराचे नाव आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, बापू कुंभार हे आपल्या पत्नीसह अमळनेर तालुक्यातील जळोद रोडवरील वीटभट्टीवर वास्तव्याला होते. मजुरी काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. २४ जून रोजी रात्री ११.३० वाजता बापू कुंभार हे त्यांची दुचाकी (एमएच १९ बीझेड ९१६२) ने अमळनेर तालुक्यातील सुनसगाव कडून अमळनेर शहराकडे जात होते. त्यावेळी धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बापू कुंभार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी त्यांची पत्नी प्रीती कुंभार यांनी गुरुवारी २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन कुवारे हे करीत आहे.

Protected Content