चोपड्यात लोखंडी सुरक्षा कठड्याला दुचाकीची धडक ; गंभीर अपघातात एक जखमी 

0
136

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अंकलेश्वर–बुरहानपूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला लावलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्यामुळे पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून एका दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. चुकीच्या ठिकाणी आणि अति जवळ बसवलेल्या कठड्यांमुळे या मार्गावरील अपघातांची मालिका वाढत असल्याने वाहनचालकांमध्येही मोठी चिंता व्यक्त होत आहे.

११ रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एम.पी. ४६ झेडएच ५६३ क्रमांकाची दुचाकी चोपड्याकडून अडावदकडे जात असताना रस्त्याच्या अगदी कडेला लावलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्याला ती जोरदार धडकली. या धडकेमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. सुदैवाने अपघातात प्राणहानी टळली.

अपघातानंतर काही सेकंदांतच परिसरात उपस्थित युवा शेतकरी शरद महाजन, शामकुमार महाजन, जितेंद्र महाजन, रिंकू महाजन आणि सचिन महाजन यांनी तत्परता दाखवत १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला. तसेच अडावद पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या अपघातानंतर महामार्गावर बसवलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण मार्गाच्या दोन्ही बाजूंना वळण भागांवर सुरक्षा कठडे बसवण्यात येत आहेत. परंतु हे कठडे मुख्य रस्त्यापासून किती अंतरावर असावेत याची कोणतीही काळजी न घेता अवघ्या दीड ते दोन फुटांवरच बसवण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा चुकीच्या आणि अति जवळ बसवलेल्या कठड्यांमुळे वाहनचालकांना पुरेशी जागा मिळत नसून अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

महामार्ग विकसित करण्याच्या नावाखाली होत असलेली अशी निकृष्ट आणि बेफिकीर बसावणी तातडीने सुधारावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.