पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच विलास लांडे यांचे चिरंजीव विक्रांत लांडे यांनी थेट वडिलांच्या पक्षांतराची घोषणाच करून टाकली. त्यामुळे विलास लांडे हे लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचे निश्चित झालं आहे. अजित पवारांना हा धक्का मानला जात आहे.
विलास लांडे हे सध्या अजित पवार यांच्या पक्षात आहेत. ते भोसरी विधानसभेचे माजी आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या महेश लांडगे यांनी ७७,५६७ मतांनी त्यांचा पराभव केला होता. हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. तेथे शरद पवार यांच्या पक्षाचे अमोल कोल्हे पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे या पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लांडे हे पुन्हा एकदा भोसरीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, अजित पवार यांचा पक्ष सध्या भाजपच्या महायुतीत आहेत. भाजप ही जागा सोडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळेच विलास लांडे पर्याय शोधत असून स्वगृही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे समजते.