
ठाणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिका सुरुवातीपासूनच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याआधी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेपासून ते सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींपर्यंत अंबरनाथमधील राजकारणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना आणि भाजपमधील उघड वाद, काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपने स्थापन केलेली सत्ता आणि त्यानंतर घडलेल्या उलथापालथीमुळे येथील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.

गेल्याच आठवड्यात भाजपने काँग्रेसच्या पाठिंब्यावर अंबरनाथ नगरपालिकेत सत्ता स्थापन केली होती. मात्र, काँग्रेसने अचानक येथील सर्व नगरसेवकांचे निलंबन केल्यानंतर राजकारणाला वेगळेच वळण मिळाले. त्यानंतर भाजपनेच या निलंबित नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. अशा पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या मदतीने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांची अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली असून या निवडीमागे खासदार श्रीकांत शिंदे यांची रणनीती निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेचे ३२ तर भाजपचे २८ नगरसेवक विजयी झाले होते. संख्याबळ भाजपकडे असतानाही उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बाजी मारली.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, भाजप आमच्यासोबत आले असते तर अधिक आनंद झाला असता. अंबरनाथ नगरपरिषदेत बहुमत असूनही सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टीने काम करण्याची आमची भूमिका आहे. भाजप शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करेल, असे संकेत मिळाले होते आणि भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत याबाबत चर्चा देखील झाली होती. मात्र, भाजपने अचानक भूमिका बदलल्याने राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना महायुतीकडे ३२ नगरसेवक असताना स्वीकृत सदस्य तीन मिळणे अपेक्षित होते. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी केवळ दोनच स्वीकृत नगरसेवक महायुतीला दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या विषयावर अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहितीही श्रीकांत शिंदे यांनी दिली.
अंबरनाथ नगरपरिषदेत सध्या भाजपचा नगराध्यक्ष असताना राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष आणि शिवसेनेचा गटनेता अशी समीकरणे तयार झाली आहेत. भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गट स्थापन केल्याचा दावा केला असला तरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडून स्वतंत्र गट उभा केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देत शिवसेनेनं भाजपला दूर ठेवत प्रभावी राजकीय डाव टाकला आणि कमी संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळवले



