जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सराफ गल्लीतील भवानी मातेच्या मंदिरासमोर असलेल्या सौरभ ज्वेलर्स दुकानाच्या मागच्या बाजूने येत २ कर्मचाऱ्यांना चॉपरचा दाखवून सोने लुटणाऱ्या ६ दरोडेखोरांपैकी ३ दरोडेखोरांना अटक करण्यात शनिपेठ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. यातील एकाला पुण्यातून तर उर्वरित दोन जणांना शहरातील राजीव गांधी नगरातून अटक केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागरसिंग जीवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी आणि लकीसिंग जीवनसिंग जुन्नी सर्व रा. राजीव गांधी नगर, जळगाव अटक केलेल्या तीन दरोडेखोरांची नावे आहेत. तिघे दरोडेखोरे हे सख्खे भाऊ आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सराफ बाजार मधील भवानी मातेच्या मंदिरासमोर सौरभ ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात सोने आणि चांदी खरेदीविक्री केली जाते. दरम्यान सोमवार २० मे रोजी पहाटे ३.३० ते ४.१५ वाजेच्या दरम्यान तीन दुचाकींवर आलेल्या अज्ञात ६ दरोडेखोरांनी सौरभ ज्वेलर्स दुकानाच्या पाठीमागून येऊन मागचे चैनल गेट कटरने तोडले. त्यानंतर लाकडी दरवाज्याच्या लहान खिडकीतून आत प्रवेश केला. दरम्यान या दुकानात नेहमी झोपणारे दोन कर्मचारी यांना लोखंडी चॉपरचा धाक दाखवत शांत बसण्याचे सांगितले आणि इतरांनी कटरच्या सौरभ ज्वेलर्स दुकानाच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडले व आत प्रवेश केला. या दुकानातून दरोडेखोरांनी सोन्याचे-चांदीचे दागिने, चांदीचे शिक्के व इतर मुद्देमाल असा एकूण ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गावित तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह पथक दाखल झाले. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. यात दोन पथक तयार करून एक जळगावात आणि एक दुसरे पुण्याला रवाना केले. पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सागरसिंग जीवनसिंग जुन्नी आणि लकीसिंग जीवनसिंग जुन्नी यांना जळगावातून अटक केली तर रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी याला पुण्यातून अटक केली आहे. दरम्यान अटक केलेले तीनही दरोडेखोर हे सख्खे भाऊ आहेत तर इतर फरार झालेले दरडखोर हे त्यांचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
यापुर्वी दोघांना केले होते हद्दपार !
यातील सागरसिंग जुन्नी आणि रणजितसिंग जुन्नी या दोघांवर चोरी, हाणामारी, धारदार शस्त्र वापरून दमदाटी करणे असे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीसात दाखल आहेत. त्यामुळे या दोघांना डिसेंबर २०२२ मध्ये जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश तत्कालिन जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले होते.