जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नामांकित वाहन व्यावसायिक डी.डी. बच्छाव यांच्या रिंगरोडवरील अजय कॉलनीतील बंगल्यावर पिस्तूलधारी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणारे फरार असलेले सात संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली आहे. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील चौकशी सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नामांकित वाहन व्यावसायिक डी.डी. बच्छाव हे आपल्या परिवारासह रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत वास्तव्याला आहे. सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी डी.डी.बच्छाव हे पत्नीसह लहान मुलाकडे पुण्याला गेले होते. घरी मोठा मुलगा किरण बच्छाव, सुन व नातू हे घरीच होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास घराच्या मुख्यदाराची बेल वाजली. बच्छाव यांनी दार उघडताच दोन तरुणांनी कुत्रा फिरवायला गेलेले तुमचे वॉचमन काका रस्त्यावर चक्कर येवुन पडले असल्याचे सांगितले. यानंतर बच्छाव यांनी दार उघडताच हातात पिस्तूल, चाकूसारख्या शस्त्रासह तोंडावर मास्क लावलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी एकामागून एक घरात प्रवेश केला.किरण यांना पिस्तूल लावून हातपाय बांधत असतांनाच अचानक आरडा ओरड झाल्याने दरोडेखोरांनी घरातून पळ काढला.
याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक एस. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कारवाईला सुरूवात केली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे विदगाव येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनुसार शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी तीन पथक नेमून विदगाव, आव्हाणे आणि जैनाबाद येथे रवाना केले. या कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने संशयित आरोपी यश सुभाष कोळी (वय-२१), अर्जून नगर ईश्वर कोळी (वय-३०), दर्शन भगवान सोनवणे (वय-२९), करण गणेश सोनवणे (वय-१८), अनिल भानुदास कोळी (वय-३१), सचिन रतन सोनवणे (वय-२७) आणि सागर दिलीप कोळी (वय-२८) सर्व रा. दाजीबा चौक, विदगाव ता.जि.जळगाव यांना अटक करण्यात आली आहे.