Home क्राईम मोठी बातमी : दरोड्याचा कट उधळला; गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह टोळीला अटक...

मोठी बातमी : दरोड्याचा कट उधळला; गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह टोळीला अटक !


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहर पोलिसांनी एका मोठ्या दरोड्याचा कट उधळत पाच सराईत गुन्हेगारांना रंगेहात पकडले आहे. चुंचाळे शिवार परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चोपडा ते चुंचाळे रोडवरील सद्गुरू लॉन्सच्या मागे गुरूवारी १९ मार्च रोजी रात्री ८:२० वाजेच्या सुमारास काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी संशयित आरोपी अंगद कैलास जाधव (वय २१, रा. अहिल्यानगर), रविंद्र भिमा गायकवाड (वय-३२, रा. पाथर्डी, अहिल्यानगर), विशाल संदिप पुंडे (वय-२०, रा. पुणतांबा, अहिल्यानगर), डिगंबर बारकु पवार (वय-३३, रा. पाथर्डी अहिल्यानगर), हरीदास पंढरीनाथ शिरसाठ (वय-४०, रा. पाथर्डी अहिल्यानगर) यांच्यासह दोन जण हे एकत्ररित्या बोलतांना दिसून आले. कारमध्ये (एमएच १६ सीसी १७५३) दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीने एकत्र जमले होते.

जप्त केलेला मुद्देमाल :
पोलिसांनी केलेल्या झडतीत आरोपी अंगद कैलास जाधव याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) आणि जिवंत काडतूस मिळून आले. याशिवाय कारच्या डिक्कीतून पांढरी रशी, मिरची पूड, टॉर्च, स्क्रूड्रायव्हर आणि एक धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. तसेच ५ महागडे मोबाईल फोन आणि १० लाख रुपये किमतीची अर्टिगा कार असा एकूण ११.१० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यातील ‘पाजी’ नावाने ओळखला जाणारा एक आरोपी आणि त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. पोलीस कर्मचारी अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन कैलास परदेशी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Protected Content

Play sound