मुक्ताईनगर-पंकज कपले । मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या ऐन शेवटच्या क्षणाला आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांना शिवसेनेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली असून यामुळे येथील निवडणूक ही वलयांकीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाल्यामुळे यंदा मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले होते. यात शिवसेनेकडून पहिल्यांदा आ. चंद्रकांत पाटील यांची कन्या संजनाताई पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. तथापि, आमदार पाटील यांनी मात्र याला साफ नकार देत आपल्या घरातून कुणी उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, मुक्ताईनगरात मोठ्या घडामोडी घडल्या. आणि आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. एवढेच नव्हे तर भाजपचे नगराध्यक्षासह सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले. यामुळे शिवसेनेने आपली रणनिती ऐन वेळेस बदलली. आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आ. चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना चंद्रकांत पाटील यांना शिवसेना पक्षाची लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले असतांना शिवसेनेच्या माध्यमातून आ. चंद्रकांत पाटील यांच्या कन्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याने आता येथील निवडणूक ही अतिशय रंगतदार आणि वलयांकीत अशीच होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.



