पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कथित रेव्ह पार्टी प्रकरणी कारागृहात असणारे डॉ. प्रांजल खेवलकर यांना आज जामीन मिळाला असून यामुळे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी या भागात कथित रेव्ह पार्टी करतांना अटक करण्यात आली होती. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर खेवलकर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. यात त्यांच्याकडे अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रण आढळल्याचा देखील दावा करण्यात आला होता. यावरून भाजपच्या नेत्यांनी खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. तर खडसे आणि त्यांच्या कन्येने याला उत्तर दिले होते.

दरम्यान, खेवलकर यांनी अटक होताच जामीन अर्ज दाखल केला नव्हता. अलीकडच्या काळात त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी झाल्यानंतर आज दुपारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यामुळे आमदार खडसे, त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्यासह खडसे व खेवलकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.



