जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूतीगृहामध्ये सोमवारी २९ सप्टेंबर रोजी दुपारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि योग्य वेळी अग्निशमन यंत्रांचा वापर केल्याने ही आग तात्काळ आटोक्यात आणण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली.

आग लागल्यामुळे प्रसूतीगृहातील मीटर जळून त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली. यामुळे परिसरात घाबराटीचे वातावरण निर्माण झाले. आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली. प्रसूतीगृहात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

कर्मचाऱ्यांनी त्वरित अग्निशमन यंत्रांचा वापर करून काही मिनिटांतच आग पूर्णपणे विझवली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती गृहाचे अधिकारी तुषार पाटील यांच्या माहितीनुसार, या घटनेत कोणत्याही रुग्णाला किंवा कर्मचाऱ्याला इजा झालेली नाही. केवळ मीटर जळाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयाच्या विद्युत व्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयाच्या विद्युत यंत्रणेचे तात्काळ ऑडिट करून दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



