मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली असून, त्यांच्या गाडीला बॉम्बस्फोट करून उडवण्याचा इशारा एका अनोळखी ई-मेलद्वारे देण्यात आला आहे. ही धमकी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यासह सुमारे ७ ते ८ पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त झाली आहे. यामुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, या ई-मेलचा पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. मंत्रालय पोलीस ठाणे आणि जेजे मार्ग पोलीस ठाण्यात देखील यासंदर्भातील मेल प्राप्त झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.
मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरू
या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखा आणि अन्य तपास यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांचे नावच का घेतले गेले? हा मेल कोणी पाठवला? त्यामागील उद्देश काय आहे? याचा तपास सुरू असून, लवकरच संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्याची नोंद आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीरतेने घेतले जात आहे.
दिल्ली दौऱ्यावर असताना धमकीचा प्रकार समोर
धमकीचा हा प्रकार उघड होत असतानाच एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून, महायुतीच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे जनतेत थेट मिसळणारे आणि लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या धमकीमुळे त्यांचे सुरक्षा व्यवस्थापन आणखी मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीमुळे राजकीय उलथापालथ?
शिवसेनेच्या ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या शिंदे गटात प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभर शिवसेनेत इनकमिंग वाढत असल्याने या धमकीचा राजकीय संबंध असू शकतो का? याबाबत चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा राजकीय आणि सामाजिक परिणाम काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.