जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सातबारा उताऱ्यावर आई व भावाचे नाव, तसेच स्लॅब रजिस्ट्ररवर नाव लावण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कुसुंबा येथील तलाठ्याला जळगाव लाच लुचपत विभागाने कारवाई करत रंगेहात पकडले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नितीन शेषराव भोई वय-३१, रा. जळगाव असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून त्यांनी कुसुंबा येथील तलाठी यांच्या कार्यालयात सातबारा उताऱ्यावर आई व भावाचे नाव लावण्यासाठी तसेच स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठी नितीन भोई यांनी तक्रार यांच्याकडे सुरुवातीला ५ हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान तडजोड अंती अखेर ३ हजार रूपये देण्याचे ठरले. या अनुषंगाने तक्रारदार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार केली. त्यानुसार पडताळणीसाठी पथकाने मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुपारास ३ हजार रुपयांची लाच घेतांना तलाठी नितीन भोई याला रंगेहात पकडले. दरम्यान या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.