धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील गोसावी समाजाच्या एका लग्नकार्यात आनंदाचे वातावरण असताना, अचानक झालेल्या भीषण हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
नेमकी घटना आणि कारण:
मिळालेल्या माहितीनुसार, विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा नीलकंठ नगरात सुरू होता. आज हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना, साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडली. या वादाचे मूळ व्हॉट्सअॅपवर प्रसारित केलेले आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ असल्याचे समोर येत आहे. याच कारणावरून आधीच तणाव होता आणि आज दुपारी साखरपुड्यापूर्वी नातेवाईकांनी अचानक कुरापत काढून धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवला.

मृत आणि जखमींची माहिती:
या रक्तरंजित संघर्षात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५), सुरेशगीर मोजगीर गोसावी (वय ५५) आणि साहिल सुरेश गोसावी (वय २२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सात जणांवर संशय, पोलीस तपास सुरू:
या हल्ल्याप्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्षु शंभू गोसावी यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, तिथे आता शोककळा पसरली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.



