Home राजकीय मतमोजणीत मोठा बदल! आयोगाचा नवा नियम लागू

मतमोजणीत मोठा बदल! आयोगाचा नवा नियम लागू

0
157


नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा  । केवळ २४ तासांत दुसऱ्यांदा मोठा निर्णय घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल केला आहे. याआधी मतदार यादीत नाव वगळण्यासंदर्भात पारदर्शक नियमांची घोषणा झाल्यानंतर, आता मतमोजणीच्या प्रक्रियेलाही अधिक स्पष्ट, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

आतापर्यंत निवडणुकांमध्ये पोस्टल बॅलेट मोजणी सुरू असतानाच काही वेळातच ईव्हीएम मतमोजणी सुरू केली जात असे. त्यामुळे अनेक वेळा गोंधळाची आणि वादविवादाची परिस्थिती निर्माण होत असे. मात्र आता आयोगाने या पद्धतीत बदल करत स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण होईपर्यंत शेवटच्या दुसऱ्या फेरीसाठी ईव्हीएम मतमोजणी सुरू करता येणार नाही.

या निर्णयामुळे मतमोजणी दरम्यान निर्माण होणाऱ्या शंका, तक्रारी आणि आरोप-प्रत्यारोपांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: गेल्या काही निवडणुकांमध्ये पोस्टल मतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिव्यांग, ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ही संख्या झपाट्याने वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर आयोगाने मतमोजणी केंद्रांवर अतिरिक्त टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोस्टल बॅलेटची मोजणी वेळेत, नीटस आणि काटेकोरपणे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. परिणामी, अंतिम निकालांची प्रतीक्षा लांबणं टाळता येणार आहे.

नवीन नियमामुळे मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक बनणार असून, मतदारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये आयोगावरील विश्वास वाढेल. निवडणुका संपल्यानंतर लागणाऱ्या वादग्रस्त आरोपांना यामुळे मोठ्या प्रमाणात आळा बसेल. अनेकदा पोस्टल बॅलेटच्या मोजणीसंदर्भात पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी समोर येत असत, त्या पार्श्वभूमीवर आयोगाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

याशिवाय, या निर्णयाची राजकीय पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. विशेषतः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय स्वच्छ आणि विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


Protected Content

Play sound