मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून माजी आमदार अरुण पाटील यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार अमोल जावळे आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.

माजी आमदार अरुण पाटील हे 1995 आणि 2004 मध्ये भाजपच्या तिकिटावर रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र 2009 मध्ये त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज ते पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत.

या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश धनके, मुक्ताईनगर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, माजी तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती पी.के. महाजन, रावेर तालुका मंडळ अध्यक्ष दुर्गादास पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी, निंभोरा बुद्रुकचे माजी सरपंच सचिन महाले, शिंगाडीचे माजी सरपंच महेंद्र बगाडे, कांडवेल सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील यांनीही समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबईत वेळेअभावी मोजक्याच समर्थकांनी प्रवेश घेतला असला तरी, हजारो कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश सोहळा लवकरच जळगाव येथे पक्षाच्या मोठ्या मेळाव्यात जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली.



