गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणूकीची तयारी करत आहे. अशातच प्रत्येक आपले मतदारसंघात निवडणूकीसाठी उमेदवार घोषित करत आहे. लोकसभा निवडणूकीचा महाराष्ट्रातील विदर्भात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल मतदान होणार आहे, यासाठी २० मार्च पासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले आहे. पण काँग्रेस पक्षाला अनेक दिवसांपासून अनेक मोठे नेते सोडून जात आहे. अशातच आता काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का बसला आहे.
भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते यांनी पक्षसदस्त्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती त्यांचा भाजप प्रवेश झाला. काँग्रेसने गुरूवारी रात्री २१ मार्च रोजी महाराष्ट्रातील आपली पहिली यादी जाहीर केली होती. गडचिरोली-चिमूर मतदार संघात उमेदवारी मिळावी, अशी डॉ. नितीन कोडवते यांची इच्छा होती. पण या यादीत गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे त्यांनी नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. नितीन कोडवते हे काँगेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु होत आहे. या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला बसणारे धक्के कमी होत नाही. माजी मुख्यमंत्री अशोच चव्हाण भाजपात गेले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सुरु असलेले हे डॅमेज कंट्रोल अजून थांबत नाही. आता काँग्रेसमध्ये प्रदेश सचिव असणारे नितीन कोडवते यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते भाजपात प्रवेश करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा एकदा भाजपने जोरदार धक्का दिला आहे.