पुण्यात भाजपला मोठा धक्का; मोठा नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अजित पवारांच्या अनेक शिलेदारांना गळाला लावल्यानंतर भाजपला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक भाजपचा बडा नेता शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. इंदापूर मतदारसंघातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपाला रामराम ठोकणार हे, जवळपास निश्चित झाले आहे.

गेल्या पाच वर्षापासून या मतदारसंघात विधानसभेची तयारी करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी दुसरा पर्याय शोधला आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील आता पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मुंबईत पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. जवळपास १ तास त्यांच्यात चर्चा झाली. इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर लढणे जवळपास पक्के झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे मतदारसंघात गाठीभेटी आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढायचीच असा आग्रह कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना केला आहे. स्वत: फडणवीस यांनी इंदापूरात जात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. मात्र विधानसभेला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारला.

Protected Content