नवी दिल्ली-वृत्तसंस्था | कॉंग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिध्द केला असून यात आरक्षणाबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली असून यासोबत अनेक महत्वाच्या घटकांना यात प्राधान्य देण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज कॉंग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. यात पाच न्यायाच्या तर २५ गॅरंटीच्या आश्वासनांचा समावेश आहे. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे केंद्रात सत्तेवर आल्यास आरक्षणाची सध्या असणारी ५० टक्क्यांची मर्यादा हटविणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या मर्यादेमुळे अनेक समाज घटकांना आरक्षण देण्यासाठी अडचणी येत आहेत. यात मराठा, जाट आदी मोठ्या समाजांचा समावेश आहे. ही मर्यादा हटविल्यास या समूहांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
दरम्यान, अन्य घोषणांनुसार, कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास गरीब घरातील महिलांना दरवर्षी एक लाखांची तरतूद, आशा वर्कर/अंगणवाडी सेविका यांच्या वेतनात वाढ, महिलांना नोकरीत ५० टक्के आरक्षण; स्वामीनाथन आयोगानुसार पीकांना हमी भाव आदींसह अन्य बाबींचा समावेश आहे.