भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात मंगळवारी एक आगळा-वेगळा आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. मूळच्या भुसावळकर आणि गेल्या दहा वर्षांपासून जर्मनीत स्थायिक असलेल्या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. प्रेरणा श्रीकांत चौधरी यांनी जर्मनीतील सहकारी डॉक्टर डॉ. आंद्रे यांच्याशी विवाहगाठ बांधली. दोन भिन्न देशांतील संस्कृती, परंपरा आणि नातेसंबंधांचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी भुसावळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
जर्मनीतील ‘मोस्ट प्रॉमिसिंग सायंटिस्ट’ म्हणून सन्मानित झालेल्या डॉ. प्रेरणा चौधरी या गेल्या नऊ वर्षांपासून बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्या जर्मनीतील २० उत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या समूहाचे नेतृत्व करीत असून, त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत जर्मनी सरकारने त्यांना एक कोटी रुपयांचे अनुदान आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवले आहे. त्यांच्या या यशामुळे भुसावळ शहराच्या नावाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे.

डॉ. प्रेरणा यांचे होणारे पती डॉ. आंद्रे हे देखील उच्चशिक्षित (पीएचडी) असून, ते जर्मनीतील पेट्रीशिया आणि क्लाऊस थेन यांचे सुपुत्र आहेत. विवाह सोहळ्यासाठी आंद्रे यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक विशेषतः भुसावळात दाखल झाले होते. या सोहळ्यामुळे शहरात आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची वर्दळ वाढली होती आणि नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली होती.
मंगळवार, दिनांक २० रोजी दुपारी १२.३६ वाजता भुसावळ येथील हॉटेल राधाकृष्णमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. चौधरी (तायडे) कुटुंबीयांनी या विवाहात साधेपणाला विशेष महत्त्व दिले. कोणतेही आहेर किंवा पुष्पगुच्छ स्वीकारण्यात आले नाहीत. श्रीकांत चौधरी, मनीषा चौधरी, प्रतिक चौधरी आणि समस्त चौधरी परिवाराने या सोहळ्याचे नियोजन केले होते, ज्यामुळे सामाजिक संदेश देणारा हा विवाह ठरला.
या विवाह सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विदेशी पाहुण्यांसाठी ठेवण्यात आलेली अस्सल भारतीय आणि खान्देशी मेजवानी. खान्देशी भरीत-भाकरी, भरीत-पुरी, कढी-खिचडी, पुरणपोळी, शेवभाजी यासह पंजाबी पदार्थांची खास मेजवानी देण्यात आली. विदेशी पाहुण्यांनी भारतीय जेवणाचा मनापासून आस्वाद घेतला आणि खान्देशी चवीचे भरभरून कौतुक केले.
या विवाहासाठी जर्मनीसह फ्रान्स, इटली, पोलंड आणि अमेरिका येथून तब्बल २२ विदेशी वऱ्हाडी भुसावळात दाखल झाले होते. भारतीय संस्कृती, पारंपरिक पेहराव, लग्नातील विधी आणि आपुलकीचे वातावरण पाहून सर्व पाहुणे भारावून गेले. विशेष म्हणजे अनेक विदेशी पाहुण्यांनी भारतीय पारंपरिक पोषाख परिधान करून विवाह सोहळ्यात सहभाग घेतला, ज्यामुळे हा सोहळा अधिकच आकर्षक ठरला.
एकूणच, भुसावळची कन्या आणि जर्मनीचा जावई यांच्या विवाहाने शहरात आनंद, अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून, हा विवाह दोन देशांतील संस्कृतींचा सुंदर संगम ठरला आहे.



