भुसावळ प्रतिनिधी | पनवेल एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या महिलेची पर्स लांबविणार्याला लोहमार्ग पोलिसांनी सहा तासात गजाआड केले आहे.
या संदर्भात वृत्त असे की, मुंबईतील अंधेरी ईस्ट या भागातील रहिवासी मोहंमद अहमद अब्दुल गनी (वय ३५) हे कुटुंबासह मंगळवारी पनवेल एक्स्प्रेसने नवागढ ते पनवेल असा प्रवास करत होते. ही गाडी भुसावळ जंक्शनवर थांबली. फिर्यादीची पत्नी वॉशरुमला गेली, तर फिर्यादी प्लॅटफॉर्मवर उतरला. ही संधी साधून चोरट्याने मोहंमद गनी यांच्या पत्नीची पर्स चोरली. त्यात ५७ हजार ७२ रूपयांचे सोन्याचे दागिने, १० हजार ५०० रूपयांचा मोबाइल होता. भुसावळ स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर ही बाब मोहंमद गनी यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी नाशिक येथे तक्रार दिली. ही माहिती मिळताच लोहमार्ग व रेल्वे पोलिसांनी संशयिताचा सर्वत्र शोध घेतला.
पोलिसांनी चौकशीची चक्रे फिरवून अमोल रवींद्र भोवते (वय ३८, रा.आरपीडी रोड, द्वारकानगर, भुसावळ) याला अटक केली असता त्याने चोरीची कबुली देऊन मुद्देमाल काढून दिला. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक राधाकिसन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुनील इंगळे, भरत शिरसाठ, हवालदार जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, अजित तडवी, सागर खंडारे, आरपीएफचे उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहायक फौजदार शुक्ला, आरक्षक भूषण पाटील, भजनलाल यांनी केली.