भुसावळ प्रतिनिधी | स्टेट बँकेच्या आनंदनगर शाखेची फसवणूक करून तब्बल १ कोटी ४९ लाख ११ हजार रूपयांची कर्ज लाटणार्या १७ जणांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
बनावट कागदपत्रे, दुसर्यांची बांधलेली घरे दाखवून स्टेट बँकेच्या भुसावळ शहरातील आनंद नगर शाखेतून १ कोटी ४९ लाख २१ हजार रूपयांचे कर्ज लाटण्यात आले. या फसवणूक प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री ९ वाजता १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात कर्जदारांसह बँकेच्या व्हॅल्युअरचा समावेश आहे. कर्ज वाटपात फसवणूक करताना बँकेच्या अधिकृत व्हॅल्यूअरची भूमिका प्रमुख राहिल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले. यात आरोपींनी कर्जदाराच्या मिळकतीचे बाजार भावापेक्षा अधिक मूल्यांकन दाखवणे, मिळकतीवर घर वा इमला नसताना तो बांधल्याचे दर्शवून वाढीव किंमतीचे मूल्यांकन सादर करणे, खोट्या सौदे पावतीच्या आधारे कर्ज लाटल्याची बाब बँकेने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाली.
२३ मार्च २०१८ ते १६ जून २०१९ दरम्यान स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेत व्यवस्थापक म्हणून विशाल इंगळे, तर १७ जून २०१९ ते २८ डिसेंबर २० दरम्यान नंदलाल बाबूलाल पाटील हे व्यवस्थापक होते. उभयंतांच्या कार्यकाळात बँकेची फसवणूक झाल्याच्या तक्रारीनंतर जळगावचे मुख्य प्रबंधक सुरेश सोनवणे यांच्यामार्फत चौकशी झाली. त्यात बँकेची १ कोटी ४९ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या अनुषंगाने स्टेट बँकेचे व्यवस्थापक मनोज बेलेकर यांनी गुरुवारी सायंकाळी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला.
मनोज बेलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आसीफ हुसेन गवळी (द्वारका नगर, भुसावळ), माजिद खान इद्रिस खान (भुसावळ), नीलेश जय सपकाळे (बुद्धवाडा, कन्हाळा), पंकज भिकनराव देशमुख (पंचशील नगर, भुसावळ), राजेश निवृत्ती मेहरे (गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ), शाह शकीर चंद (मुस्लिम कॉलनी, खडका रोड, भुसावळ), शशिकांत रमाकांत अहिरे (फुलगाव, ता.भुसावळ), शकील इमाम गवळी (कन्हाळे बुद्रूक, ता.भुसावळ), शोभा पोपट पगारे (यावल रोड, राहुल नगर, भुसावळ), संदीप पुजाराम मैराळे (खडका, ता.भुसावळ), संतोष बबन सूर्यवंशी (रामदासवाडी, खडका रोड, भुसावळ), अफसाना बानो कलीम खान (द्वारका नगर, भुसावळ), गजानन रमेश शिंपी (नेब कॉलनी, भुसावळ), शाह अरबाज शाह अब्बास (पंचशील नगर, भुसावळ), बँकेचे व्हॅल्युअर समीर बेले (दुसरा मजला, रयल हब बिल्डिंग, जिल्हा न्यायालय जवळ, मालेगाव) या कर्जदारांसह बँकेचे व्हॅल्युअर अशोक दहाड (रा. नवी पेठ, एमजी रोड टॉवरजवळ, जळगाव), कमलाबाई प्रकाश बोरसे (पीओएच कॉलनी, भुसावळ) यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.