भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई करताच तेथील सरपंचाने थेट पोलिसांनाच मारहाण करून धमकावण्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी सरपंचासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना कुर्हे पानाचे येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विशेष पथकाने मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकून १६ जुगार्यांना ताब्यात घेतले. त्यात गोपाळ बारी व महेश वराडे यांचा समावेश होता. या दोघांना घेऊन जात असताना सरपंच जीवन प्रल्हाद पाटील, प्रमोद रामा भोई, ईश्वर भागवत भोई व सुभाष भिका पाटील यांनी पोलिसांना मारहाण करून कारवाईला विरोध केला. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी रमण सुरळकर यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यात असणार्या दोन जणांना सोडवून पळ काढला. तसेच याप्रसंगी सरपंच जीवन पाटील याने पोलिसांना पाहून घेऊ अशी धमकी दिली.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी रमण सुरळकर यांच्या फिर्यादीवरून सरपंचासह चौघांंविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.