भुसावळ प्रतिनिधी | जिल्हा बँक निवडणुकीत तांत्रीक कारणावरून अर्ज बाद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात माजी आमदार संतोष चौधरी यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले असून यावर २६ रोजी सुनावणी होणार आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी यांनी भुसावळ तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व संयुक्त शेती संस्था या मतदार संघातून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, छाननीत अर्ज अवैध ठरला. निवडणूक नियम ३५ (अ) (५) (ब) (२) तरतुदीचे पालन झाले नसल्याचे नमूद करत छाननीत त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान,या निर्णयाविरोधात चौधरींनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १६० चे कलम १५२ अ अन्वये विभागीय सहनिबंधक, नाशिक यांच्याकडे अपिल केले आहे. त्यावर मंगळवार दि.२६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीला प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, शांताराम धनगर, राजेंद्र चौधरी या प्रतिवादींना आपले म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे निर्देश विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी दिले आहेत. चौधरींतर्फे ऍड. धनंजय खेवलकर यांनी काम पाहत आहेत.
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेवर अनेकांनी आक्षेप घेतले असतांना संतोष चौधरी यांनी दाखल केलेल्या अपीलावर नेमका काय निर्णय होणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.