भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी नगरसेवक कृष्णधन कर उर्फ धोनी यांनी सफाई कामगार वॉर्डात कामासाठी न आल्याने शिविगाळ करीत त्यास कामावरून काढण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात सफाई कर्मचारी मदन किसन पतरोडिया (46, पंचशील नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक समीर कृष्णधन कर उर्फ धोनी (रा. भुसावळ) यांच्रोया विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानुसार, सोमवार, 23 रोजी सकाळी 5.40 वाजता ते शिवाजीनगरात कामगार राजन जेथे व सुनील घेंगट यांच्यासह काम करीत असताना यावेळी समीर कृष्णधन कर हे 7.30 वाजेच्या सुमारास आले व त्यांनी आमच्या वॉर्डात काम करायला सांगितल्यानंतरही येथे का आले म्हणून आमच्या वॉर्डात काम कर, असे बजावले. आपण त्यांना येथील काम आटोपल्यानंतर कामासाठी येतो, असे सांगितल्याने धोनी आपल्या अंगावर धावून आले.

या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, धोनी यांनी तुम्ही फुकटचा पगार घेतात, काहीच काम करत नाही, असे म्हटल्याने आपण त्यांना पोलिसात तक्रार करू, असे सांगितल्याने त्यांनी शिविगाळ करीत आपली बहिण नगरसेविका असल्याने मुकादमी काढून टाकण्याची धमकी देत शासकीय कर्तव्यात अडथळा आणला. दरम्यान, सफाई कामगारावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात कर्मचार्यांनी संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली तसेच कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
या प्रकरणी मदन किसन पतरोडिया यांच्या तक्रारीवरून समीर कृष्णधन कर उर्फ धोनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



