भुसावळ प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अमरदीप टॉकीज चौकात विविध खाद्य पदार्थाचे दुकाने थाटली असून शहरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभर मुस्लिम बांधव रोजे म्हणजेच उपास ठेवतात. इस्लाम धर्मामध्ये याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत रोजे ठेवतात.
मुस्लिम बांधव सकाळी चार वाजेपासून रोजे ठेवण्यासाठी तयारीला सुरुवात करतात. सकाळी 6 वाजेपासून सहरीला सुरुवात केली जाते. दिवसभर रोजा ठेवल्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर रोजा सोडण्यात येतो. रोजा सोडण्यासाठी खारीक किंवा गोड पदार्थाचा वापर केला जातो. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला भुसावळ बाजारपेठेमध्ये मुस्लिम बांधवांनी विविध खाद्य पदार्थाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली असल्याचे दिसून आले.