Home क्राईम भुसावळ पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’: कोम्बिंग ऑपरेशनमध्ये १४ गुन्हेगारांची झाडाझडती, दोन सराईत जेरबंद!

भुसावळ पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’: कोम्बिंग ऑपरेशनमध्ये १४ गुन्हेगारांची झाडाझडती, दोन सराईत जेरबंद!


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी सण-उत्सव आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री विशेष ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या धडक मोहिमेत पोलिसांनी १४ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली असून, गंभीर गुन्ह्यात पसार असलेल्या दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे भुसावळमधील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’चा कडाका :
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ उपविभागात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. विशेषतः ‘आर्म ॲक्ट’ आणि चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींवर या मोहिमेत लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी संशयित ठिकाणांवर छापेमारी करत १४ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.

दोन फरारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेले दोन गुन्हेगांरांना देखील अटक केली आहे. समीर शहा जब्बार शहा उर्फ डमरू आणि केवल अनिल टाक (दोन्ही राहणार भुसावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रतिबंधक कारवाईचा बडगा
तपासणी केलेल्या १४ आरोपींपैकी ०४ सराईत गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. “गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील,” असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound