भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांवर कारवाई करताना भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने बसस्थानक परिसरातून एका संशयितास गावठी पिस्टलसह जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा मध्यप्रदेशातील भोपाल येथील रहिवासी असून त्याच्यावर तेथे गोळीबाराच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. या कारवाईमुळे भुसावळ शहरात मोठी गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी भुसावळ शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींवर विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने शहरातील संशयित व्यक्तींवर गुप्त माहितीच्या आधारे नजर ठेवण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की भुसावळ शहरातील बसस्थानकाच्या गेटजवळील रिक्षा स्टँड परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्टल घेऊन फिरत असून तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. या माहितीची खात्री करून पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार डी.बी. पथकाने घटनास्थळी सापळा रचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव शादाब रईस कुरेशी (वय ३५, रा. बाग फरहत अफजा, हुजूर सिकंदरी, भोपाल – मध्यप्रदेश) असे असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा लोखंडी गावठी पिस्टल व मॅगझीन जप्त करण्यात आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२१/२०२६ नुसार आर्म अॅक्ट ३/२५ तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीची अधिक माहिती मिळवण्यासाठी भोपाल पोलिसांशी संपर्क साधला असता तो तेथील रेकॉर्डवरील निगराणी आरोपी असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे १४ मार्च २०२६ रोजी भोपाल येथील अशोका गार्डन पोलीस स्टेशन हद्दीत त्याने आपल्या ताब्यातील पिस्टलने एका व्यक्तीवर गोळीबार करून तेथून फरार झाल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. या घटनेबाबत भोपाल येथे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती भोपाल येथील अशोका गार्डन पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय बळीराम नेरकर करत आहेत. या कारवाईत डी.बी. पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



