भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रवादीच्या ओसीबी सेलचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेतील संघांचा प्रलंबीत असणारा निधी मिळाला आहे. यातून रंगकर्मी व नाट्यसंस्थांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सविस्तर माहिती खालील लिंकवर क्लिक करून वाचा
याबाबत वृत्त असे की, राज्य नाट्य स्पर्धेसाठी राज्यातील विविध नाट्य संस्थांनी स्वखर्चाने नाटके सादर केली आहेत. यात निर्मिती, कलावंतांच्या भोजनाचा खर्च, वाहन भाडे आदींचा समावेश असतो. याआधी प्राथमिक फेर्या संपल्यानंतर संबंधीत संस्थांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत असे. तर अलीकडच्या दोन-तीन वर्षात मात्र स्पर्धा संपल्यानंतर हा निधी संस्थांना मिळत असे. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे ५९ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेर्या होऊन आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असला तरी अद्याप संस्थांना निधी मिळाला नव्हता.
याची दखल घेऊन स्वत: नाट्य रसिक असणारे राष्ट्रवादीच्या ओसीबी सेलचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एक निवेदन दिले. यात नाट्य स्पर्धांमध्ये पदरमोड करून सहभागी झालेल्या नाट्य संस्था व रंगकर्मींना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. परिणामी संस्थांना तातडीने निधी मिळावा अशी मागणी यात करण्यात आली होती. यानंतर त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पर्यावरण व सांस्कृतीक कार्य मंत्री आदित्य ठाकरे यांना उचीत कार्यवाही करावी असे पत्र दिले होते. याची दखल घेऊन संबंधीत मंत्रालयाने राज्यभरातील नाट्य संस्थांचा प्रलंबीत असणारा निधी तातडीने प्रदान केला आहे.
उमेश नेमाडे यांनी भुसावळसह खान्देशातील नाट्या चळवळीला चालना देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. यानंतर आता त्यांच्याच पुढाकाराने नाट्य कलावांतांना दिलासा मिळाल्याने त्यांचे रंगकर्मींनी कौतुक केले आहे.