भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्ती काळात कंत्राटी पध्दतीत कार्यरत असणार्या कर्मचार्यांना पुनर्नियुक्ती द्यावी अशी मागणी या कर्मचार्यांनी केली असून त्यांनी या संदर्भात भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांना साकडे घातले आहे.
कंत्राटी कोविड कर्मचार्यांची सेवा ३० नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे. फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, उपजिल्हा रुग्णालय, विमानतळ, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा वॉर रूममध्ये कार्यरत कंत्राटी आरोग्य सेवकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अन्य कर्मचार्यांची सेवा मात्र संपली आहे.
या अनुषंगाने शहरासह तालुक्यात कोविड अंतर्गत कार्यरत असणार्या कंत्राटी कर्मचार्यांनी भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु. पाटील यांची भेट घेत समस्या मांडली. कार्यकाळ संपुष्टात आल्याने या कंत्राटी कर्मचार्यांना उस्मानाबाद व सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर पुन्हा नियुक्ती मिळावी म्हणून पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
याबाबत डॉ. नि.तु. पाटील म्हणाले की, मध्य प्रदेश सरकारने सर्व कंत्राटी आरोग्य सेवकांना मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. उस्मानाबाद, सांगलीसह अनेक जिल्ह्यात मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने मुदतवाढीचा निर्णय सात दिवसात घ्यावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा त्यांनी दिला आहे.