भुसावळ प्रतिनिधी । गंभीर गुन्हे असणार्या पैठणकर टोळीतील तिघांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी एक वर्ष हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.
भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर, पोलीस प्रशासनाने उपद्रवींची यादी तयार करून हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. याच्या अंतर्गत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे तात्कालिन पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी १० नोव्हेबर २०२० रोजी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात संघटितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्या टोळीविरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव दिला होता. त्यात पैठणकर टोळीतील तिघांचा समावेश होता.
या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी संबंधितांची बाजू जाणून घेतली. यानंतर बुधवारी त्यांच्या एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश काढले. यामध्ये हेमंत जगदीश पैठणकर (वय २६, रा.गरूड हॉस्पिटलजवळ, भुसावळ), चेतन उर्फ गोल्या पोपट खडसे (वय २८, रा.हनुमान नगर, भुसावळ) आणि प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (वय २८, रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) यांना हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.
संघटीत टोळी तयार करून घातक शस्त्रे, तलवार जवळ बाळगून लोकांना धमकावणे, ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाण, चोरी, बळजबरीने घरांमध्ये प्रवेश, लोकांच्या मालमत्तेची जाळपोळ आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने त्यांना हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, शहरातील अजून काही टोळ्यांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.