भुसावळ प्रतिनिधी | एकनाथराव खडसे व संतोष चौधरी यांच्या एकत्रित प्रयत्नातून भुसावळचा विकास होणार असल्याची प्रतिक्रिया आज शहरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. यामुळे भुसावळचे राजकारण एका नवीन वळणावर तर अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर ते काल रात्री उशिरा जळगावात दाखल झाले. तर आज सकाळी ते जळगावहून भुसावळला आले. यावेळी त्यांचा शहरात ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम त्यांचा जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळा जवळ भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या नंतर गांधी पुतळ्याजवळ त्यांचा सत्कार झाला तेथून ते अष्टभुजा देवी येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक नितीन धांडे यांनी आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमाला आले. तर शेवटी त्यांचा खडका चौफुलीवर सत्कार करण्यात आला.
यातील अष्टभुजा देवी मंदिराजवळ आयोजित केलेला सत्कार हा सर्वात लक्षणीय ठरला. कारण हा सत्कार संतोष चौधरी यांच्या समर्थकांततर्फे आयोजित करण्यात आला होता. संतोष चौधरी आणि अनिल चौधरी हे चौधरी बंधू आणि एकनाथराव खडसे यांच्यातील वैर अवघ्या जगाला माहित आहे. या दोन्ही बाजू गेल्या जवळपास दोन दशकांपासून एकमेकांसमोर ठाकलेल्या आहेत. यात राजकीय संघर्ष तर आहेच. पण अनेकदा अगदी रक्तरंजित पातळीवर देखील दोन्ही बाजूंनी झालेला संघर्ष समस्त भुसावळकरांनी अनुभवलेला आहे. एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर चौधरी बंधूंची कुचंबणा होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. तथापि एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळेला संतोष चौधरी हे व्यासपीठावर उपस्थित असल्यामुळे आता चौधरी आणि खडसे यांच्यात दिलजमाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान संतोष चौधरी यांनी स्वतः एकनाथराव खडसे यांच्याशी यांच्यासोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भुसावळात नवीन समीकरणे उदयास येणार असल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती आजच्या कार्यक्रमात दिसून आली.
खरं तर, स्वतः संतोष चौधरी व अनिल चौधरी यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले. अनिल चौधरी यांचे पुत्र आता अनेकदा राजकीय व्यासपीठांवर दिसत असले तरी त्यांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर संतोष चौधरी यांचे पुत्र तथा भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी हे आपल्या सहकार्यांसह तसेच नगर पालिकेतील गटनेते उल्हास पगारे हेदेखील आपल्या सहकार्यांसह या ठिकाणी उपस्थित होते. याप्रसंगी खुद्द एकनाथराव खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की सत्ते सोबत असणे आणि सत्तेसोबत नसणे हे भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधारी सध्या अनुभवत आहेत. राज्यातील सत्ताधारी हे सोबत असले तर विकास चांगल्या पद्धतीने करता येतो असे सांगितले. यामुळे आता आगामी काळामध्ये भुसावळातील विकास करण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. अर्थात यासाठी सत्ताधार्यांसह विरोधक देखील सोबत येणार असल्याचा संदेश त्यांनी दिला.
तर दुसरीकडे सचिन चौधरी यांनी आपण एकनाथराव खडसे यांच्या स्वागतासाठी आलो असल्याचे सांगत यातून विकास होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. पक्षाचे नगर पालिकेतील गटनेते उल्हास पगारे यांनी तर थेट नाथाभाऊ आणि संतोष भाऊ यांंच्या एकत्रित प्रयत्नातून भुसावळच्या विकासाला नवीन वळण लागणार असल्याचे सांगितले. तर याच प्रकारे पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक नितीन धांडे यांनी देखील नाथाभाऊ आणि संतोष भाऊ यांच्या एकत्रित प्रयत्नातून आता भुसावळातील सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचे वक्तव्य केले. अर्थात यामुळे आता दोन दशकांनंतर का होईना एकनाथराव खडसे आणि संतोष चौधरी यांच्या गटांमध्ये हात मिळवणी सुरू झाली असल्याची चर्चा आता भुसावळमध्ये सुरू झालेली आहे.
खालील व्हिडीओत पहा चौधरी समर्थकांनी केलेले नाथाभाऊंचे स्वागत
https://www.facebook.com/508992935887325/videos/1077034572728418