भुसावळ प्रतिनिधी । शहरातील लिंपस क्लब भागातील खूनाचे रहस्य उलगडले असून क्षुल्लक वादातून संदीप गायकवाड या तरूणाची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून यातील तिघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत लिंपस क्लब भागातील खुनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अजय अशोक पाठक (वय १९, ऑर्डनन्स फॅक्टरी परीसर, भुसावळ), पंकज संजय तायडे (वय १९, राहुल नगर, भुसावळ) व आशिष श्रीराम जाधव (वय १९, श्रीराम नगर, भुसावळ) या तिघांचा संदीप गायकवाड यांच्यासोबत तू माझ्याकडे का पहातो ? या क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. यातूनच गायकवाडच्या डोक्यात संशयितांनी दगड घातला आहे. यात संदीपचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घटनास्थळी रात्रभर पडून होता. सकाळी याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यातून वर नमूद केलेल्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांनी जबाबात आपण खून केल्याची कबुली दिल्याची माहिती सोमनाथ वाघचौरे यांनी याप्रसंगी दिली.
ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसी सोमनाथ वाघचौरेे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुणगहू, शहर व बाजारपेठचे हवालदार राजेश बोदडे, संजय सोनवणे, मोहंमद वली सैय्यद, सोपान पाटील, जुबेर शेख, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख यांच्या पथकाने पार पाडली.